पुणे : भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा 17 जानेवारी 2023 रोजी पुण्यात समारोप झाला. या बैठकीला 18 सदस्य देश, 8 अतिथी देश आणि 8 आंतरराष्ट्रीय संघटनांचे 64 प्रतिनिधी उपस्थित होते. आज पहाटेच्या सुमारास या पाहुण्यांनी पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल, नाना वाडा आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली.
विविध ठिकाणी भेटी : पुण्यात जी 20 परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल होते. यंदाच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखळी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. पुण्यात 16 आणि 17 तारखेला जेडबल्यू हॉटेल येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीनंतर परदेशी पाहुण्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल व नाना वाडा भेट दिली.
परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजावट : परदेशी पाहुणे येणार आहे म्हणून पहाटे पासूनच रस्ता बंद करण्यात आला होता. शनिवार वाडा तर काल पासूनच पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या बाहेर फुलांमध्ये अष्टविनायक गणपतीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच केरळी वाद्य दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर वाजविण्यात आले. मंदिराबाहेर आणि मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाने भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत 2023 वर्षासाठीच्या पायाभूत सुविधा कार्यक्रमावर चर्चा केली.
जी 20 बैठकीत या संकल्पनेवर चर्चा : भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित या दोन दिवसीय बैठकीत, अन्य मुद्द्यांसह "उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा : समावेशक, लवचिक आणि शाश्वत" या प्रमुख संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. शहरांना आर्थिक विकासाचे केंद्र बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा, भविष्यासाठी सज्ज शहरी पायाभूत सुविधांची उभारणी, शाश्वत उद्दिष्टे पूर्ण करण्यात शहरांची भूमिका, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पायाभूत सुविधांसाठी खाजगी वित्तपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुक वळवणे आणि सामाजिक असंतुलन कमी करणे अशा विविध पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दुसरी बैठक मार्चमध्ये : पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींना पुण्याच्या समृद्ध पाककृतींचा आस्वाद घेण्याची तसेच इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी देखील मिळाली. एकूणच, प्रतिनिधींनी केवळ फलदायी बैठकाच घेतल्या नाहीत तर पुण्याचा सांस्कृतिक अनुभव देखील घेतला. पायाभूत सुविधा कार्यगटाची दुसरी बैठक 28 आणि 29 मार्च 2023 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार आहे.
हेही वाचा : Pune G 20 : जी २० परिषदेत विदेशातील पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका!