पुणे - बारामती तालुक्यातील सांगवी येथील एका विवाहितेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर, तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगवी येथील तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. पती, सासू, नणंद, सासरे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत तिच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले.
सासरच्या मंडळींवर हत्या माहेरच्या नातेवाईकांचा आरोप
सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेवर विषबाधा झाली होती. बारामतीतील खासगी दवाखान्यात आणि त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार तिच्यावर उपचार सुरू होते. काल तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गीतांजलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर खून केल्याचा आरोप करत तिच्या मृतदेहावर सांगवी येथील सासरच्या घरासमोर आज अंत्यसंस्कार केले.