बारामती- शहरातील अठरा प्रभागातील रस्त्यांच्या डांबरीकरण, मजबुतीकरण व काँक्रिटीकरणाची ७८ कामे येत्या आठवड्याभरात सुरू केली जाणार आहेत. बारामती नगरपरिषद ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेणार आहे.या सर्व कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
बारामतीत खंडोबानगर, आमराई परिसर, कॅनॉल रोड, तीन हत्ती चौक ते पतंग शहानगर, इंदापूर रस्ता बाह्यमार्ग या हद्दीसह ठिकठिकाणी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यांच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाची नागरिकांची गेल्या अनेक महिन्यापासून मागणी आहे. त्यानुसार नगरपरिषदेने शहरातील १८ प्रभागातील ही कामे प्रस्तावित केली असून तीन कंत्राटदार कामे करणार आहेत.
कंत्राटदारांना काम करण्याचे आदेश-
कंत्राटदारांना काम करण्याचे करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असून, जुन्या गावठाणासह वाढीव हद्दीतील कामेही करण्यात येणार आहे. तीन कंत्राटदारांना ही कामे मिळाली आहेत. या कामांची सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच कामे सुरू होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कामाचे असणार तीन टप्पे-
या कामांचे तीन टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात ४ कोटी ३३ लाखांचे तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी ८६ लाखांची तर तिसऱ्या टप्प्यात ४ कोटी ४८ लाखांची कामे होणार आहेत. सध्या पाऊस नाही. आचारसंहिता नाही किंवा इतर काही अडचणी नसल्याने पुढील तीन महिन्यातील सर्व कामे मार्गी लावली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा- अपंगत्वावर मात करून स्वत:च्या 'पाया'वर उभा आहे जीम ट्रेनर
हेही वाचा- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ 26 जानेवारीला सुरू करण्याच्या हालचालींना वेग