पुणे - कोविड-१९च्या रुग्णांना प्रकृती बिघडल्यावर वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या घटना पुणे शहरात वारंवार घडत आहे. अनेक रुग्णांचे ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून चक्क दोन ऑक्सिजन मशिन्स खरेदी केली आहेत. आपआपसात निधी उभारून खरेदी केलेल्या या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या छोटेखानी मशीन आज कोविड-१९ च्या रुग्णांना देवदूत ठरत आहे.
वारजे व परिसरातील संतोष घोसाळे, अरविंद हाबडे, विश्राम ढोले, सुधीर मोरे, अमिर शेख, शंकर बोडके, अशोक खत्री, दिनेश गोळे, नंदलाल नीत व आनंद सावंत या मित्रांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत 'सेव्ह लाइफ' हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व यातून आपल्या परिसरातील व शहरातील होम क्वारंटाइन झालेल्या कोविड-१९च्या रुग्णांना ऑक्सिजनची पुरवठ्याची गरज लागल्यास, त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेपर्यंत ऑक्सिजनपुरवठा करता यावा याकरिता दोन ऑक्सिजन मशिन्स खरेदी केली आहेत. आपापसात पैसे जमा करून त्यांनी दोन मशिन्स खरेदी करून, ती १६ सप्टेंबरपासून परिसरातील रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
हेही वाचा - कंगना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे
'शहरात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर ऑक्सिजनच्या कमतरतेच्या बातम्या माध्यमांतून येत होत्या. आपण यात काही करू शकतो का, याबाबत आम्ही मित्रांनी चर्चा केली व या ऑक्सिजन मशीनची माहिती घेतली. मुंबईला जाऊन 2 मशीन्स खरेदी केली आणि लगेच आम्हाला कळले की, आमच्या भागात एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे. लगेच आम्ही त्या रुग्णाला हे मशीन दिले. आज आपण आपल्या नागरिकांसाठी काहींना काही तरी करत आहोत, यासाठी खूप चांगले वाटत आहे. आपल्यामुळे एखाद्याला मदत होत आहे तर, यापेक्षा मोठे काम कोणते,' अशा भावना यावेळी अरविंद हाबळे यांनी व्यक्त केल्या.
हे मशीन वापरायलाही खूप सोपे असून हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे काम करते. यासाठी कोणताही सिलिंडर किंवा टाकीची गरज भासत नाही. फक्त लाइटवर हे मशीन चालते. आतापर्यंत 15 हून अधिक रुग्णांना या मशीनचा मोठा लाभ झाला आहे. यामध्ये कोंढवा, शिवणे, वारजे, कर्वेनगर तर हडपसरपर्यंत गरज असलेल्या रुग्णांपर्यंत आम्ही मशीन पोहोचवली आहेत. गरज भासल्यास शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आम्ही ही मशीन्स रुग्णांना मोफत देणार आहोत, असेही हाबळे या वेळी म्हणाले.
कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन धाप लागण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच वेळीच ऑक्सिजनची गरज पूर्ण न झाल्याने अनेकांना मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. तर, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा रुग्णांसाठी हे मशीन उपयुक्त ठरत आहे. हे छोटेखानी मशीन आज हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी गरज असलेल्या आणि हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी परतल्यावरही धाप लागणाऱ्या रुग्णांना वरदायी ठरत आहे.
हेही वाचा - आता सुरक्षितपणे खा पाणीपुरी; औरंगाबादेत सुरू झालंय 'पाणीपुरीचं मशीन'