पुणे (आळंदी) - कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा होत आहे. या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट असल्याने प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आळंदी बाहेरून येणाऱ्यांना नागरिकांना बंदी घातली आहे. फक्त मानाच्या तीन दिंड्यांना परवानगी दिली गेली आहे. परंपरेनुसार संजीवन सोहळ्याचे विधी पार पडणार आहेत. मागील आठ दिवसांपासून ज्ञानेश्वर समाधी मंदिराबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून वारकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज् दिले जात आहेत.
वारकऱ्यांना साथीचे आजार वगळता कोरोनाची लक्षणे नाहीत -
आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. यातील वारकरी हे ग्रामीण भागातील प्रदुषणाच्या विळख्यात नसलेले आहेत. त्यामुळे या व्यक्तींची रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. यामध्ये किरकोळ साथीचे आजार वगळता कोरोना संबंधित लक्षणे वारकऱ्यांमध्ये आढळली नाहीत. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार दिले जात आहेत. यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम आळंदीत काम करत आहे.
संजीवन समाधी सोहळ्यात भाविकांना बंदी -
संजीवन समाधी सोहळ्यासाठी फक्त मानाच्या तीन दिंड्यांना परवानगी देण्यात आली आहे. या एका दिंडीत 20 वारकऱ्यांचा सहभाग असणार आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी होणार आहे. इतरांना या सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.