पुणे - राज्यासह पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला आहे. हीच अडचण लक्षात घेऊन पुण्यात शीख बांधवांच्या वतीने रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली आहे. 9 बी या फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. ही रुग्णवाहिकेची सेवा केवळ महिलांसाठीच आहे.
कोरोनामुळे सध्या प्रत्येक जण संकटात आहे. कोरोना काळातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी 9 बी फाऊंडेशनच्या वतीने सेवा सुरू करण्यात आली होती. या संस्थेचे सदस्य बेड मिळवून देण्यासाठी, औषधे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र हे काम करत असतानाच रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे.
या फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या सर्व सोयींनी सज्ज असणारी एक ॲम्बुलन्स रस्त्यावर धावत आहे. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेची चालक महिला आहे. या चालक महिलेला स्वसंरक्षणासाठी लागणारे आवश्यक ते प्रशिक्षण या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत आहे.
महिलांसाठी रुग्णवाहिकेची सेवा
संस्थेच्या सदस्या असलेल्या पुनीत कौर म्हणाल्या, काही महिलांना रुग्णवाहिकेतून जाताना अडचणीचा सामना करावा लागल्याचे आमच्या लक्षात आले होते. काही ठिकाणी रुग्णवाहिकेत महिलांसोबत छेडछाडीच्या घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर आम्ही महिलांची सुरक्षीतता लक्षात घेऊन, फक्त महिलांसाठीच रुग्णवाहिका हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमामध्ये रुग्णवाहिका चालवण्यापासून ते इतर सर्व कामासाठी महिलांनाच नियुक्त करण्यात आले असून, ही संपूर्ण सेवा निशुल्क आहे. 9 बी फाउंडेशनच्या या उपक्रमात असलेली रुग्णवाहिका सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस यासारख्या आधुनिक यंत्रांनी सुसज्ज आहे. हा उपक्रम सध्या एका रुग्णवाहिकेवर सुरु करण्यात आला आहे. मात्र भविष्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
हेही वाचा - चिमुकल्या जुळ्यांना घरी ठेवून 'या' दाम्पत्याचे कोरोना बाधितांच्या सेवेला प्राधान्य