बारामती- बारामतीच्या एमआयडीसीमधील कंपनीचा मेल आयडी हॅक करून, सुमारे 4 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारामती येथील झुआरी ऍग्रो केमिकल लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक जुजे जोकिम बरेटो (रा.अभितेज गॅलक्सी, बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
11 ते 31 डिसेंबरदरम्यान घडला प्रकार
बरेटो यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर घटना 11 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान घडल्याचे म्हटले आहे. सदर कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय गोवा राज्यातील जय किसान भवन, झुआरीनगर येथे आहे. या ग्रुपची एक कंपनी बारामती येथील एमआयडीसीमध्ये आहे. या कंपनीमध्ये खत तयार करण्यात येते. कंपनीला लागणारा कच्चा माल जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतल जातो. ही कंपनी गेल्या दहा वर्षांपासून दक्षिण दुबईमध्ये असलेल्या 'आरएनझेड इंटरनॅशनल' या कंपनीकडून मोनो अमोनियम, फाॅस्फेट, मोनोपाॅटेशियम असा कच्चा माल घेते. 2 सप्टेंबर 2018 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत झुआरीने या कंपनीकडून 4 कोटी 97 लाख रुपयांचा 1570 टन माल घेतला होता. डिसेंबर 2018 मध्ये झुआरी कंपनील हा माल मिळाला होता.
सॉफ्ट कॉपीची केली होती मागणी
दुबईतील कंपनीचे पैसे देणे काही कारणास्तव बाकी होते. ही रक्कम देण्यासाठी झुआरी कंपनीने आरएनझेड इंटरनॅशनल कंपनीच्या रमेश आनंदन यांच्या मेल आय़डीवर बॅंक डिटेल्स देण्यासंबंधीचा मेल 11 डिसेंबर रोजी केला होता. दि. 14 रोजी त्यांच्याकडून बॅंक डिटेल्स पाठविण्यात आले. रक्कम जमा केल्यानंतर त्याच्या साॅफ्ट काॅपीज पाठवाव्यात, अशी मागणी आरएनझेड कंपनीने केली होती. त्यानुसार झुआरीने आरएनझेड कंपनीला रक्कम पाठवण्याबाबत पणजी येथील युनियन बॅंकेला मेलद्वारे कळविले. बॅंकेने 24 डिसेंबर रोजी ही रक्कम झुआरीने दिलेल्या बॅंक खात्यावर वर्ग केली.
मेल हॅक करून फसवणूक
बॅंकेने रक्कम जमा केल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे झुआरीला दिली. झुआरीने पुढे ती आरएनझेड कंपनीला पाठवली असता, या बॅंक डिटेल्स आमच्या कंपनीच्या नसल्याचे तसेच तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचे आरएनझेड कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर झुआरीने तात्काळ बॅंकेशी संपर्क साधत ज्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत, त्या खात्याचा केवायसी तपशील देण्याची मागणी केली. झुआरीने आरएनझेड कंपनीला यापूर्वी केलेले मेल तपासले, ते बरोबर होते. परंतु त्या कंपनीसह झुआरीचा मेल आयडी कोणी तरी हॅक करून, वेगळ्याच बॅंक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.