पुणे - जिल्ह्यातील बारामती शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. याकामी शहरातील दुकाने, संस्था, कार्यालयेयासह अन्य ठिकाणच्या खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. याअंतर्गत शहरातील नोंदणी झालेले सुमारे चौदाशे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस पोलीस ठाण्याशी जोडले जाणार आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी कारभार स्वीकारल्यानंतर नवनवीन उपक्रम राबवत गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. याकरिता ते समाजातील वेगवेगळ्या घटकांची मदत घेत आहेत.
वाढत्या चोरींंच्या घटनांना आळा-
शहरातील दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यातच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकारही वाढले आहेत. अनेकदा चोरटे सोनसाखळी हिसकावत शहराच्या बाहेर निघून जातात. या घटनांच्या तपासासाठी शहराच्या चौबाजूंनी असणाऱ्या टोलनाक्यावरही पोलिसांनी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याचाही तपासकामी पोलिसांना उपयोग होणार आहे. त्यामाध्यमातून या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलयाला सुरुवात केली आहे.
रस्ते राहणार 24 तास नजरेखाली....
गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याबरोबरच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्यांची जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. तसेच रस्त्यावरील दुकानातील कॅमेर्यांची दिशा रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील रस्ते 24 तास नजरेखाली राहणार आहेत.