पुणे - बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका ४ वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत मृत बालकाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रणवीर राहुल तावरे (वय ४) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. ९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी राहुल अशोकराव तावरे ( वय ३७, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी तक्रार दिली आहे. 9 जूनला रणवीर जेवण करून घरातच खेळत होता. काही वेळाने तो आसपास आढळून न आल्याने घरातील लोकांनी वस्तीत सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. रात्री दहाच्या सुमारास घरापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीत बॅटरी लावून पाहिले असता रणवीर पाण्यात तरंगताना दिसला. त्याला पाण्याबाहेर काढून बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा एका तासापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.
तावरे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी या घटनेबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोबतच चौकशी करण्याची मागणी केली आहे. घटनेेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करत आहेत.