पुणे - राजगुरुनगर परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी, सासू, मेव्हणा आणि भाचा अशा चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर पुण्यात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आयुष प्रसाद यांनी या परिसराची पहाणी करुन कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजगुरुनगर शहराच्या लगत असलेल्या राक्षेवाडीतील एका इमारतीमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती राहत होती. त्याच्या शेजारील चाळीत त्याची बहिण तिच्या कुटुंबासह राहत होती. बाधित व्यक्ती पुण्यातील एका खासगी रुग्णालयात कामाला जात होता. बहिण भावाच्या घरात एकमेकांचा वावर होता. ही व्यक्ती शुक्रवारी कोरोनाबाधित आढळून आली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींना प्रशाससानाने हायरिक्स म्हणून घोषित केले होते.
या अकरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 16 मे रोजी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स आणि केस कापणारा न्हावी या तिघांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र, कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी, सासू, मेव्हणा आणि भाचा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी सोशल डिस्टन्स पाळावे, घरीच थांबावे व शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी केले आहे.