पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांनी जीवन संपवले आहे. दीपक पुंडलिक थोटे ( वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि समीक्षा दीपक थोटे (वय 16 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे कुटुंबातील सर्वांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आहे. दरम्यान, या कुटुंबाने आत्महत्या केली असल्याचे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात अल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली आहे.
परिसरातील रहिवाशांची चौकशी : सदर घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेबद्दल माहिती जाणून घेण्याता प्रयत्न केला आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे.
आर्थिक नुकसान झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज : येथे राहत असलेले डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंदच असल्याचा संशय आला. त्यानंतर पोटे यांनी केशवनगर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, कोणतही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. पोलिसांनी चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठवले आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.