पुणे - बारामतीत आज २४ तासात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत चार रुग्णांपैकी एक जण सातारा जिल्ह्यातील असून एक जण इंदापूर तालुक्यातील सणसर येथील आरोग्य कर्मचारी आहे. तर उर्वरित दोघे बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहेत.
बारामतीत दिवाळीपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी कमालीची घसरून ५ वर येऊन ठेपली होती. मात्र दिवाळी सणानिमित्त कोरोनाची कोणतीही तमा न बाळगता खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, विनाकारण प्रवास, गर्दी करणे. यामुळे बारामतीत पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून बारामतीत रोज ३० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे.
बारामतीतील मृत्यूचा आकडा
काल बारामतीत दिवसभरात ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २३ रुग्ण शहरातील असून १८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. बारामतीत आत्तापर्यंत ४ हजार ८३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार ४१८ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. तर १२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.