पुणे - येथे पूर्व वैमनस्यातून 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये उघड झाली आहे. तीन महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला असून गुन्हेगार गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह जाळण्यात आला होता. या घटनेप्रकरणी चार आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. जसबीरसिंग उर्फ बिल्लू उर्फ विक्की गुजारसिंग विरदी (वय-19) रा. पिंपरी असे हत्या करून जाळून टाकण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, या प्रकरणी नीरज अशोक जांगयानी (वय- 26), ललित लालचंद ठाकूर (वय- 21), योगेश केशव पंजवाणी (वय- 31), हरज्योतसिंग रणजितसिंग लोहाटी (वय- 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जसबीरसिंग आणि त्याच्या भावाने काही महिन्यांपूर्वी यातील आरोपी नीरज जांगयानी याला बेदम मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून मार्च महिन्यात मृत जसरबीसींग याला इतर मित्रांच्या मदतीने काळेवाडी परिसरातील गोठ्यामध्ये नेऊन त्याचा गळा दाबण्यात आला. तर, इतर मित्रांनी जसरबीसींग डोक्यात दगड घातला, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर पाला पाचोळा आणि वाळलेली लाकडे टाकून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने त्याचा मृतदेह पेटवून देण्यात आला.
तर, दुसरीकडे मृत जसबीरसिंग हा मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत होते. दरम्यान, पिंपरी पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, संबंधित तरुणाचा खून झाला आहे. त्यानुसार चार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तब्बल तीन महिन्यानंतर या हत्येच्या प्रकरणाची घटना उघडकीस आली असून आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.