बारामती (पुणे) - महाविकास आघाडी सरकारमधून राजू शेट्टी यांनी बाहेर पडू नये, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हिताचे धोरण सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत राबवल्याचे दिसून येत नाही, यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले - महाविकास आघाडी सरकारने 2013 च्या भूमिअधिग्रहण कायद्यात मोडतोड केली. या कायद्यात दुरुस्ती केल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्या पैकी सध्या 30 टक्केच मोबदला मिळत आहे. उसाच्या एफआरपीची मोडतोड करून तुकड्या-तुकड्यात एफआरपी देणे, शेतकऱ्यांना जबरदस्तीने रात्रीची 3 तास ते ही खंडित स्वरूपात वीज देणे, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे, त्यांना तुटपुंजी मदत करणे, व नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिक विमा कंपन्या कर्जबाजारी होण्याऐवजी हजारो कोटी रुपये कमावले. हे सर्व महाराष्ट्र सरकार पहात होते. हे काय शेतकरी हिताचे धोरण आहे काय.. असा सवाल उपस्थित करून त्यांनी जयंत पाटील यांच्या विधानावर भाष्य केले. आज माजी खासदार राजू शेट्टी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आहे. तसेच सध्याच्या राज्य सरकारने भूमिअधिग्रहण कायद्यात बदल केल्याने शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमी झाला आहे. केंद्रातील कृषी विषयक कायदेमागे घेण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. शेती मालाला हमी भाव मिळत नाही. अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी बळीराजा 'हुंकार यात्रा' सुरू केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.