पुणे- ऐन दिवाळीच्या सणाला बाजारात फुलांची आवक वाढल्याने फुलांचे दर कोसळले आहेत. यामुळे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेवंतीला ३० ते ४० व झेंडूला १० रुपये दर मिळाला आहे. आगामी दोन दिवसांमध्ये दर असेच राहण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.
दिवाळीच्या सणामुळे फुल शेतीतून चांगले पैसे मिळतील या आशेवर शेतकरी होते. परंतु यंदा पावसाळा संपून गेल्यावर परतीचा पाऊस सुरू झाला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. फुलशेतीला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे फुले खराब होत आहेत आणि उत्पादन देखील कमी निघत आहे. फुलशेतीसाठी पोषक हवामान व शेतजमीन असलेल्या दौंड तालुक्यातील यवत आणि परिसरातील भागात अनेक शेतकरी फुलशेती करतात. परंतु सद्यास्थितीत फुलांना चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
फुलांना बाजारभाव कमी मिळत आहे. त्यातच मजुरांची कमतरता असल्याने शेतातील फुले तोडणीसाठी त्यांना ३५० रुपये रोज द्यावा लागत आहे. मजुरांना रोजगार देऊन खाली शिल्लक काहीच राहत नसल्याने शेतकरी फुलांचा व्यवसाय सोडून देण्याच्या मनस्थितीत आहेत. पुणे-मुंबई-हडपसर बाजार समितीत शेवंती, झेंडू, गुलाब, आस्टरची फुले विकत घेण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, इत्यादी ठिकाणांच्या व्यापाऱ्यांच्या उड्या बाजार समितीत पडल्या होत्या. परंतु, फुलांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कोसळले. दिवसभरात शेवंतीला ३० ते ४० रुपये, झेंडूला १० ते १५, अॅस्टरला ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळाले. पंधरा दिवसांपूर्वी दसऱ्याला शेवंती, झेंडूसह इतर फुलांचीसुद्धा अशीच परिस्थिती होती. आगामी दोन दिवसांमध्ये दर असेच राहण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा- 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'