पुणे- विदेशी पाहूणे अशी ओळख असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा मावळमध्ये उच्च दाब वाहिनीला धडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सहा फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
फ्लेमिंगो हे हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशातून दरवर्षी महाराष्ट्रात येत असतात. सहा फ्लेमिंगो पक्षी हे मावळ भागातील नवलाख उंबरे येथे उच्चदाब विद्युत वाहिनीला धडकून मरण पावले. सुरुवातीला हे फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बर्ड फ्लूमुळे तर मृत पावले नसावेत ना, अशी शंका सुरुवातीला उपस्थित झाली होती. मात्र, वनविभागाने केलेल्या पडताळणीनंतर शवविच्छेदन अहवालात विजेच्या धक्क्याने मृत पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा-राज्यपालांच्या मुद्यावरून भाजपाचा विखारी प्रचार - नाना पटोले
नवलाख उंबरे परिसरात मृतावस्थेतील फ्लेमिंगो आज सकाळी आढळले होते. फ्लेमिंगोचे मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याची भीती स्थानिकांना वाटत होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी या पक्षाचे शवविच्छेदन केले. हे मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा