पुणे (पिंपरी-चिंचवड) : महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता. यातच एक लोखंडी होर्डिंग खाली पडले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना लगेच रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या पिंपरी - चिंचवड भागात जोरदार वारा सुटला आहे. तसेच पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. त्यामुळे झाडे, धोकादायक होर्डिंग याखाली नागरिकांनी थांबू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रावेत परिसरात घडली घटना- रावेत किवळे परिसरात मुंबई-पुणे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर ही घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे काही लोकांनी लोखंडी होर्डिंगखाली आश्रय घेतला होता. अचानक हे लोखंडी होर्डिंग त्यांच्यावर कोसळले. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे धोकादायक होर्डिंग, झाडांखाली पावसामध्ये आश्रय न घेण्याचे आवाहन पालिका व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाच जणांचा मृत्यू - आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जोरदार वारा सुटला होता आणि त्यावेळी काही लोकांनी त्या लोखंडी होर्डिंगखाली आश्रय घेतला होता. वाऱ्यामुळेच ते लोखंडी होर्डिंग कोसळले. यावेळी तिथे होर्डिंगखाली थाबलेले लोकं दबली असून, यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्यात पावसाची शक्यता - राज्यातील विदर्भ, मराठवाडा या भागात येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आताही मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यात गारांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळेही अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्र उडून गेले आहेत.
हेही वाचा - Unseasonal Rain : पुढील आठवड्यात राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता