दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील मळद येथे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पो चालकाला लुटल्याची घटना २९ ऑगस्टला घडली होती. या घटनेतील ५ आरोपींना जेरबंद करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. तर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मंगेश चव्हाण आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे. आरोपींनी चालकाकडून तब्बल २९ लाख रुपयांची लूट केली होती. त्यापैकी १९ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
या लुटीच्या घटनेची सविस्तर माहिती अशी की, २९ ऑगस्टच्या रात्री तक्रारदार टेम्पो चालक पुण्याकडे पोल्ट्रीचे खाद्य आणण्यासाठी जात होता. त्यावेळी मळद गावातील वृंदावन हॉटल जवळ त्याचा टेम्पो आला असता, ६ ते ७ आरोपींनी त्याचा टेम्पो अडवला आणि त्याच्याकडून २९ लाखाची रक्कम लुटून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर या टेम्पो चालकाने या घटनेची माहिती तत्काळ दौंड पोलिसांना दिली. त्यानंतर दौड पोलिसांनी या आरोपींचा तत्काळ शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या घटनेतील १९ लाख रुपये हस्तगत केले आहेत.
जाड्या उर्फ पैगंबर तय्यब मुलानी (वय 20राहणार अमराई बारामती) अख्ख्या उर्फ अक्षय बाळासाहेब वावरे (वय 20 राहणार माळेगाव बारामती) , मनोज बाळासाहेब साठे (वय 22 राहणार मौजे रुई तालुका बारामती)प्रकाश पांडुरंग गोर्गल (राहणार वाखारी तालुका दौंड) विक्रम विलास शेळके (वय 23 राहणार वाखारी ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण जवळजवळ 19 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये गुन्ह्याचा मास्टर माईंड मंगेश चव्हाण आणि त्याच्या साथीदाराचा समावेश आहे. या दोघांकडे लुटीतील उर्वरित रक्कम असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेतील तक्रारदार टेम्पो चालक हा लोणी काळभोर येथील रहिवासी आहे. या गुन्ह्यात त्याच्याकडून लुटली रक्कम ही पोल्ट्री फार्मच्या खाद्याची सांगण्यात येत आहे. मात्र, ते पैसे गुटखा व्यवसायात वापरले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली .
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , पोलीस कर्मचारी सुरज गुंजाळ, महेश पवार, हेमंत भोंगळे, पोलीस नाईक मलगुंडे, पोलीस शिपाई जब्बार सय्यद , नारायण वलेकर पोलीस नाईक बोराडे यांनी केला.