पुणे - पिंपरी-चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र भोसले (वय ५५) असे पतीचे नाव असून संगीता भोसले (वय ४८) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
त्यांच्यात नेहमीच किरकोळ भांडण होत असल्याचे सांगण्यात येत असून शनिवारी ही घटना घडली. अद्याप ठोस असे कारण समोर आलेले नाही. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीच्या कृष्णानगर येथे अरुणा अपार्टमेंट आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास राजेंद्र भोसले यांनी पत्नीच्या हाताची नस कापून खून केला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर स्वतः फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत भोसले दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचा विवाह झाला आहे, तर एक त्यांच्या सोबतच राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
भोसले दाम्पत्याची घराच्या बेडरूममध्ये झटापट झाली होती. त्यानंतर राजेंद्र यांनी संगीता यांच्या हाताची नस कापली. त्या जखमी अवस्थेतच घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आल्या. दरवाजा उघडून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाला त्यांनी मदतीसाठी हाक मारली. आईची हाक ऐकून तो धावतच आला आणि पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच संगीता यांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांचे पती राजेंद्र यांनी आतील बेडरुममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेचे मुख्य कारण अद्याप समजले नसून त्याचा तपास चिखली पोलीस करत आहेत.