पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिला कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबाला आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कोरोनामुक्त पोलीस कुटुंब हे राहत्या घरी पोहचताच नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
पोलीस कर्मचाऱ्यानंतर त्याच्या कुटुंबाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्यांच्यावर महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. अखेर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या घरी स्वागत करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या तीन जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.