पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत १० चारचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, आग मोठी असल्याने शेजारी असणाऱ्या फ्रुट स्टॉलला देखील आग लागली. यामध्ये तेथील १२ हातगाड्याही जळाल्या आहेत.
सव्वा तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र, ही आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवडमधून काळेवाडीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर मदिना ऑटोमोबाईल्स आणि अरबाज फ्रुट स्टॉल आहे. मदिना ऑटोमोबाईल्सला अचानक आग लागली, यात गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारी जळून खाक झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने आगीच्या झळा शेजारी असणाऱ्या अरबाज फ्रुट स्टॉलला बसल्या. या आगीमध्ये एकूण १२ गाड्या हातगाड्या जळाल्या आहेत. मारुती सुझुकी, स्विफ्ट डिझायर, वोक्स व्हॅगन, व्हॅगनर होंडा सिटी, सेन्ट्रो कार, मॉरिस, झायलो अशा गाड्या जळून खाक झाल्याने गॅरेज चालक दानिश अब्दुल कुरेशी यांच मोठे नुकसान झालेले आहे.