पुणे - शहरातील बिबवेवाडी परिसरात एका मांडव गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पीएमटी कॉलनीत असणाऱ्या डेकोरेटर या मांडव साहित्य पुरवणाऱ्या दुकानाला आज (दि.3) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमटी कॉलनीत त्रिमूर्ती डेकोरेटर हे मांडव साहित्य पुरवठा करणारे दुकान आहे. आज दुपारी 2.45 मिनिटांनी दुकानाला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आकाशात धुराचे लोळ दिसत होते. त्रिमूर्ती डेकोरेटर शेजारीच मानवी वस्ती असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे नागरिकांनी घरातील काही साहित्य काढून घेत लांब नेले होते. पण, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयातून आणि इतर ठिकाणाहून सात गाड्या, तीन देवदूत गाड्या आणि पाण्याच्या टॅंकरने आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीमध्ये त्रिमूर्ती डेकोरेटर्स या दुकानातील खुर्च्या, सोफे, गोदामातील कापडी पडदे, प्लास्टिकची फुले, सजावटीसाठी लागणारे लोखंडी साचे सर्व वस्तू संपूर्ण जळाल्या आहेत. या दुकानात शेजारीच असणाऱ्या आठ घरांना आगीची झळ असल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही
हेही वाचा - खडसे जमीन घोटाळा प्रकरण : झोटिंग समितीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरण्याची मागणी