राजगुरुनगर (पुणे) - खेड तालुक्यातील धामणे गावातील वेफर्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, आग आणि धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीनंतर वेफर्स कंपनी सुरू करण्यात आली होती. मात्र, आग लागल्यामुळे आधीच संकटात असलेल्या कंपनीला पुन्हा आर्थिक फटका बसला आहे.
ग्रामीण भागात उत्पादित होणारे बटाटे स्थानिक पातळीवर विकत घेऊन ही कंपनी वेफर्स आणि बटाट्यापासून उत्पादित होणारे विविध पदार्थ तयार करते. लॉकडाऊननंतर नियम आणि अटींवर ही कंपनी सुरू करण्यात आली. मात्र, आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. यावेळी कंपनीत असणाऱ्या कामगारांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने जीवित हानी टळली आहे. मात्र, कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहेत.