पुणे - नामांकित संशोधन संस्था असलेल्या IISER संस्थेमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत काही विद्यार्थी प्रयोग करत असताना अचानक ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
![आग विझवितांना अग्निशमन दल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12476730_pune5.jpg)
दुपारच्या सुमारास काही विद्यार्थी हे प्रयोगशाळेत प्रयोग करत होते. यावेळी आग लागल्याची घटना घडल्यानंतर इमारतीत असणाऱ्या सर्वानी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. IISER संस्थेची ही इमारत तीन मजली आहे. सुरुवातीला आग लागलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर जमा झाला. आकाशातही धुराचे लोट दिसून येत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम इमारतीत कुणी अडकून पडले नाही, याची माहिती घेतली आणि त्यानंतर मदत कार्याला सुरुवात केली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही.