खेड(पुणे) - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरण येथे १९ मे रोजी चार शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेड पोलिसांकडून कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलसह चार शिक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल - एका पालकाने शाळा प्रशासन आणि शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तमिळनाडू येथील रिथीन डी. डी. या विद्यार्थाचे पालक के. के. धनशेखर यांच्या तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलीसांत कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूल आणि चार शिक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 मे रोजी चासकमान धरण येथे सायंकाळच्या सुमारास विद्यार्थी फिरण्यासाठी गेले होते. मात्र त्यात चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर राजगुरूनगर पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदिस्त शाळेतील मुले धरणावर गेली कशी? - सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात आहे. असं असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली? असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. आता याबाबत थेट पालकानेच तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात नामवंत शाळा म्हणून ओळख असलेल्या कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुल प्रशासनासह शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने आता शिक्षण विभाग काय भुमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.