पुणे - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांविरोधात आर्थिक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजनकुमार शकंरराव तावरे असे त्यांचे नाव आहे. तावरे हे शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचेही अध्यक्ष आहेत. तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा आर्थिक अपहार केला. यासंदर्भात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा केला आहे.
बारामती पोलीस ठाण्यात माळेगाव कारखान्याचे संचालक आणि पतसंस्थेचे सभासद सुरेश तुकाराम खलाटे यांनी रंजनकुमार तावरे तसेच पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णांजी खैरे यांच्याविरुद्ध शनिवारी (१८) रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली. २०११ मध्ये नंदकुमार कृष्णाजी खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र तुकाराम बुरुंगले (माळेगाव बुद्रुक) आम्हा तिघांच्या कर्जमागणी प्रकरणी कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या आहे. आमच्या नावे प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले. सदर रक्कम बेअरर चेकद्वारे आमच्या परस्पर काढून घेतली असल्याचे सुरेश तुकाराम खलाटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
हेही वाचा - टाटा मुंबई मॅरेथॉन: हाफ मॅरेथॉनमध्ये तिर्था पून प्रथम
यानंतर पोलिसांनी फिर्यादीनुसार तसेच सहाय्यक निबंधक चौकशी अहवालाच्या आधारे पतसंस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, रकमेचा अपहार करणे, विश्वास घात करणे आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.