बारामती (पुणे) - पाच लाख मुद्दल रकमेच्या बदल्यात १० लाख व्याजासह १५ लाख रुपये दिल्यानंतरही लिहून घेतलेली दोन एकर जमीन पलटून न देणार्या चार सावकारांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर काशिनाथ वणवे, दत्तात्रय राजाराम वणवे (दोन्ही रा. लाकडी, ता. इंदापुर जि पुणे) महादेव उर्फ बिट्टु जालींदर सांगळे व मनोज विष्णु सांगळे (दोन्ही रा. जळोची, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. बापू श्रीरंग वणवे (रा. लाकडी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारने मुलीच्या लग्नासाठी घेतले होते पैसे
२०१५ मध्ये तक्रारदाराला मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी भास्कर व दत्तात्रय वणवे या भावकीतील दोघांना त्यांनी अडचण सांगितली. त्यांनी बिट्टु सांंगळे यांच्याकडून पैसे घेऊन देतो, व्याज द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सांगळे यांनी तक्रारदाराला ५ लाख रुपये दिले. त्यापोटी तक्रारदाराकडून तीन कोरे चेक घेण्यात आले.ऑगस्ट २०१५ पर्यंत तक्रारदाराने व्याजापोटी ९० हजार रुपये दिले.
सुरक्षेच्या कारणास्तव सावकाराने घेतली जमीन लिहून
आरोपींनी सुरक्षेच्या कारणास्तव लाकडी येथील फिर्यादीची एक एकर जमीन खुश खरेदी म्हणून लिहून घेतली. त्यानंतर पुन्हा काही कालावधीनंतर आणखी एक एकर जमीन लिहून घेण्यात आली. २०१९ मध्ये भास्कर वणवे यांनी तक्रारदाराच्या दुचाकीचे आरसी बुक नेले. ५ लाखाच्या बदल्यात १० लाखांच्या व्याजासह आजवर १५ लाख रुपये दिले असतानाही जमीन पलटवून दिली नाही. २२ आॅक्टोबर २०२० ला ही जमीन आरोपींनी विकली. त्यानंतर या जमिनीचा ताबा संबंधिताला द्यावा यासाठी ३० आॅक्टोबर २०२० ला आरोपींनी घरी येत शिविगाळ, दमदाटी करत जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.