पुणे - बदलत्या काळात महिलांच्या आकांक्षांना मर्यादा घालू शकेल असे कुठलेच क्षेत्र राहिलेले नाही. आधुनिक जगातली आव्हाने पेलण्यासाठी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही संसाराला हातभार लावण्यासाठी महिला पदर खोचून उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या रिक्षांवर चालक म्हणून पुरुषांचीच मक्तेदारी असल्याचे दिसते. मात्र, आता रिक्षा चालकाचे हे क्षेत्र महिलांना खुणावू लागले आहे. पुणे शहरातील महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या तेजस्विनी संस्थेने महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.
हेही वाचा - अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक
संसाराचा गाडा ओढण्यासाठी रिक्षाची तीन चाके चालवण्याची कसरत करायला महिला देखील पुढे आल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ४० महिला रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. पुरुष रिक्षाचालक या महिलांना हे प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणानंतर महिलाही सफाईने रिक्षा चालवायला शिकल्या आहेत. या व्यवसायाबद्दल मनात असलेली भीती बाजूला ठेवत कोण काय म्हणेल याचा विचार न करता महिलांनी रिक्षाचे स्टेअरिंग हातात घेतले आहे. महिलाही या नवीन क्षेत्रात प्रदार्पण करायला उत्सुक आहेत. त्यांना आता लवकरच शिकाऊ परवाना देखील मिळणार असून रिक्षा चालक महिला असल्याने महिला प्रवाशांनादेखील प्रवास करताना आश्वस्त वाटेल. त्यामुळे लवकरच पुण्याच्या रस्त्यावर महिला रिक्षा चालक दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.