पुणे - लग्न झाले असताना मुलाने परस्पर दुसरा प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांनी या दुसऱ्या सुनेचा खून करण्याची सुपारी दिली. मात्र, पैसे दिल्यानंतरही सुनेचा खून केला जात नसल्याने संबंधित सासऱ्याने सुपारी देणाऱ्यांकडे खून तरी करा, अन्यथा पैसे परत करा, असा तगादा लावला होता. यात सुपारी दिलेल्या लोकांनी सुनेचा खून न करता सासऱ्याचाच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यात हा प्रकार घडला आहे.
विनायक भिकाजी पानमंद असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली असून इतर एकाचा शोध म्हाळुंगे पोलीस घेत आहेत.
पाच वर्षांपूर्वी झाला होता विवाह
अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. तर मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विनायक भिकाजी पानमंद यांचा मुलगा अजित याचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, वडिलांना न सांगता दोन वर्षांपूर्वी अजितने दुसरा प्रेम विवाह केला होता. यातून वडील विनायक आणि मुलगा अजित यांच्यात नेहमी वाद होत होते. तसेच, मुलाचा पहिला संसार देखील विस्कटल्याची भावना मयत विनायक यांच्या मनात होती.
आरोपींनी उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तूल आणले
अखेर, दुसऱ्या सुनेचा खून करण्याचा कट सासरे विनायक यांनी रचला. त्यासाठी संबंधित तीन आरोपींना पिस्तूल आणि सुनेला ठार करण्यासाठी 1 लाख 34 हजारांची सुपारी देण्यात आली. त्यानुसार तिन्ही आरोपींनी उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तूल आणले. मात्र, महिलेचा खून करायचा असल्याने ते घाबरले होते. अवधी निघून गेल्याने मयत विनायक यांनी आरोपींकडे सुनेचा खून करा किंवा पैसे परत करा, असा तगादा लावला होता. याला कंटाळून आरोपींनी विनायक यांना खेड तालुक्यातील वराळे येथे बोलावून तिघांनी मिळून गळा दाबून त्यांचा खून केला. या प्रकरणी तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात म्हाळुंगे पोलिसांना यश आले आहे.