पुणे - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 75 वर्षीय सासऱ्याने सुनेवर लोखंडी सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातील संतोषनगर येथे घडली. सुनेवर हल्ला करून मोटार सायकलरून पसार झालेला सासरा पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळला. सासरा आणि सून या दोघांवरही चाकण येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - 'मराठा समाजाचा सरसकट ओबीसी वर्गात सामावेश करा, अन्यथा 15 दिवसात....'
अधिक माहितीनुसार, राधिका मोरेश्वर येवले (वय. ३५ रा. संतोषनगर) असे त्या सुनेचे नाव आहे. सासऱ्याचे नाव पुरुषोत्तम दगडू येवले (वय ७५) आहे. पुरुषोत्तम येवले याच्यावर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी देखील मिळाली आहे. तर, राधिका आणि सासरा पुरुषोत्तम या दोघात मागील अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. राधिका हिला घरात राहूच द्यायचे नाही, या कारणावरून तिला सासरा पुरुषोत्तम हा त्रास देत होता. बुधवारी सकाळी राधिका ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती, त्यावेळी सासरा पुरुषोत्तम हा सुनेला जिवे मारण्याच्या हेतूने पाठलाग करत गच्चीवर गेला, त्यावेळी तेथे त्याने तिच्या मान, हात, गाल आणि पायावर लोखंडी सुरीने सपासप वार केले.
या हल्ल्यात सून राधिका या गंभीर जखमी झाल्या. सासऱ्याच्या तावडीतून सुटत राधिका या गच्चीवरून खाली धावत आल्या. तिच्या पाठोपाठ सासराही खाली धावत आला आणि दुचाकीवरून पसार झाला. यानंतर शेजाऱ्यांनी जखमी राधिकाला तात्काळ रुग्णालयात हलविले. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - लोणावळ्यात डॉक्टर दाम्पत्याच्या घरी दरोडा; 66 लाखांचा ऐवज लंपास