पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवडमधील 12 वर्षीय गिरीजा लांडगे आणि वडील धनाजी लांडगे यांनी पुन्हा महाराष्ट्राची मान सन्मानाने उंच केली आहे. आफ्रिकेमधील सर्वात उंच शिखर माउंट किलीमांजारोवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. कोणत्याच पर्वतरांगेचा भाग नसलेल्या आफ्रिका खंडात असणारे मात्र, जगातील एकमेव सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारोची उंची 6 हजार 895 मीटर एवढी आहे. म्हणतात ना, डर के आगे जीत है हेच या बाप लेकीच्या जोडीने साध्य करून दाखवले आहे.
6 हजार 895 मीटर उंचीचं शिखर केलं पार -
6 हजार 895 मीटर एवढ्या उंचीच शिखर चार टप्प्याने पार करण्यात आले. अत्यंत थंड वातावरणात ही मोहीम फत्ते करण्यात आली. कधी वाळवंट, ऊन, पाऊस, खडकाळ भूभाग, दमट वातावरण या सर्वांना तोंड देत यशस्वीरित्या शिखर सर करण्यात आले आहे. कौतुकास्पद म्हणजे चढाई दरम्यान, 15 अंश ते 20 अंश डिग्री तापमानात देखील चढाई सुरू ठेवण्यात आल्याचे धनाजी यांनी सांगितले. प्रथम गिलमन्स पॉईंट्स नंतर स्टेला पिक अन मग सर्वोच्च असणारा शिखरमाथा उर्हु पीक म्हणजेच माउंट किलीमांजारो सर करण्यास गिरिजाला यश आले. हे शिखर सर करण्यासाठी बाप लेकीला साडेआठ तास लागले. मुख्य शिखरावर पोहोचताच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले फलक फडकविण्यात आले. तसेच, महाराजांच्या नावाचा जयघोष केला गेला.
गिरीजा जगातील पहिली मुलगी -
26 जुलै रोजी रशियामधील माउंट एलब्रुस 12 व्या वर्षात सर करणारी गिरीजा जगातली पहिली मुलगी ठरली आहे. तर, माउंट किलीमांजारो सर करणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे, असे देखील सांगितले जात आहे. सेव्हन समिटपैकी माउंट एल्ब्रुस आणि माउंट किलीमांजारो ही दोन्ही शिखरे अवघ्या 20 दिवसांमध्ये यशस्वीरित्या सर करणारी गिरिजा लांडगे ही जगातली पहिली मुलगी ठरली आहे आणि पहिली बापलेकीची जोडी आहे. यावेळी धनाजी लांडगे म्हणाले की, माउंट एल्ब्रुस पेक्षा खूप वेगळा अनुभव या मोहीमेच्या चढाई दरम्यान आला. प्रत्येक पर्वत हा दुसऱ्या पर्वतासारखा असूच शकत नाही. एकाची दुसऱ्या पर्वताबरोबर तुलना होऊ शकत नाही. या मोहीमेत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शरीराचा अन मनाचा कस लागतो. दररोज विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. शेवटचा दिवस शारीरिक क्षमता आणि मनाचा कणखरपणा असेल तरच यशाच्या शिखरावर नेऊ शकतो याचा अनुभव आम्हाला या मोहीमेत आला. एल्ब्रुसप्रमाणे हे शिखर गिरिजा गाठेल, असा विश्वास होता. पण हा विश्वास पूर्ण करण्यासाठी गिरिजाने खूप मोठ्या अन कठीण परिस्थितीचा सामना करत इच्छाशक्तीच्या जोरावर शारीरिक त्रासाला न जुमानत मानसिक बळावर हे शिखर सर केले. गिरिजाचा बाप म्हणून मला तिचा खूप अभिमान आहे, असे ते आवर्जून सांगतात.