बारामती - उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना उचलण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला. यानंतर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे-सोलापूर हायवेवर रस्तारोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या.
अनेक वर्ष उजनी धरणातील पाणी इंदापूरला मिळण्याच्या फक्त घोषणा होत असतात. आताही उजनीतून इंदापूरला ५ टीएमसी पाणी देण्याचे आदेश निघाले. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्याआधीच सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्याला तीव्र विरोध केला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध केला. त्या विरोधाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द करत असल्याचे घोषित केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यात उमटू लागले आहेत.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पाणी आमच्या हक्काचे असून आम्ही यापुढे न्यायालयीन लढाई लढून पाणी इंदापूरला मिळवण्याचा प्रयत्न करू. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला प्रयत्न हाणून पाडला मात्र इंदापूर तालुक्यातील जनता दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी ठाम पणे उभी असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले.