पुणे - राज्यासह देशात कोरोनाच मोठे संकट आहे. कोरोनामुळे देशात जवळपास दोन महिने झाले लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजीपाला विक्री सुरू करण्याचे मार्केटही काही वेळ सुरू आणि त्यानंतर बंद करण्यात आले. परिणामी शेतातील शेतमाल वेळेत बाजारात न पोहोचल्याने त्यावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुण्याचे मार्केट जवळ आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने त्यांना माल विकता येत नाही. तसेच कमी दराने द्यावा लागतोय. यामुळे, शेतातील माल हा वेळेत बाजारात पोहोचत नसून परिणामी शेतातील पीक जागेवरच सडून खराब होत आहेत. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांवर या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकरी अनंत चौधरी यांनीही आपल्या वांग्याच्या शेतात नांगर फिरवला आहे. तर त्यांच्यासारखे अनेक शेतकरी वांगी, काकडी, गवार, भेंडी, या पालेभाज्यांना बाजारपेठा उपलब्ध नसल्याने आणि योग्य बाजारभाव मिळत नसल्याने पीक काढून टाकत आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती समजून याकडे लक्ष द्यावे तसेच अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.