पुणे - दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी नेहमीच धडपड करत असतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकरी करत आहेत. अशी परिस्थिती असतानाही या संकटावर मात करत शेतकरी उन्हाळी बाजरीचे यशस्वी पीक घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परंतु, शिल्लक राहिलेल्या पाण्याचे नियोजन करून चासकमान येथील शेतकऱ्याने ५ एकर शेतात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले. आज हे पीक यशस्वीपणे उभे राहिले असून संपूर्ण बाजरी दाणेदार झाली आहे. उन्हाळी बाजरीची लागवड करताना असताना कुठल्याही प्रकारचे औषध, रासायनिक खते यांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उन्हाळी बाजरीची लागवड करण्यात आली आहे.
बाजरीला कमी प्रमाणात पाणी आणि योग्य नियोजन केल्यामुळे ही बाजरी यशस्वी झाली आहे, दुष्काळी परिस्थिती असतानाही योग्य नियोजन असेल तर, शेती करण्यास कोणतीही अडचण येत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली आहे.