पुणे - ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटानंतर शेतकरी आता शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने संकटात सापडला आहे. शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथील शेतकरी बंडु शेलार यांनी दोन एकर फ्लॉवर आणि कोबीच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे.
हेही वाचा... आदिवासींसह वंचित घटकांना सीएए आणि एनपीआरचा त्रास होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
मोठ्या भांडवली खर्चातून बंडु शेलार यांनी आपल्या दोन एकर शेतात फ्लॉवरची लागवड केली. पोटच्या मुलांप्रमाणे फ्लॉवरची काळजी घेतली. वेळेवर पाणी, औषध फवारणी केली. पीकही चांगले दर्जदार आले. मात्र, सध्या फ्लॉवरला बाजारात दोन रुपये प्रतिकिलोचा बाजारभाव मिळत आहे. यातून मजुरीचाही खर्च मिळत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे.
बंडु शेलार यांनी ८० पैसे प्रमाणे फ्लॉवरच्या रोपांची खरेदी करुन दोन एकर शेतात लागवड केली. फ्लॉवरची लागवड मजुरी, खते,औषधे यासाठीचा खर्च दोन लाखांपेक्षा जास्त झाला आहे. फ्लॉवरही चांगल्या दर्जाचे तयार झाले असून मोठे उत्पादन मिळाले. मात्र आता हाच फ्लॉवर कवडीमोल बाजारभावाने विक्री होत असल्याने काढणीचा खर्चही मिळत नाही. त्यामुळे हताश शेतकऱ्याला डोळ्यासमोरच उभे पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा... ग्राऊंड रिपोर्ट : आदिवासी समाज सीएए आणि एनआरसीच्या कसोटीवर ठरणार नापास?
शेतकरी मोठ्या मेहनत घेत, शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करतो. मात्र, उत्पन्नाची वेळ आली की, शेतमालाला मिळणाऱ्या बाजारभावाची चिंता सतावते. त्यामुळे काहीवेळा बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत येतो आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांकडून शेतमालाला हमीभाव मिळण्याची मागणी होत आहे.