पुणे- जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीतील कापूरहोळ गावात तोतया पोलिसांनी एका दागिन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. ही घटना काल (6 ऑगस्ट) रात्री पाचच्या सुमारास घडली. यात दोरेडेखोरांनी 35 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ गावात काल सायंकाळी पाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून 5 जण उतरले. यातील तिघांनी पोलिसांचा गणवेश घातला होता. हे सर्व बालाजी ज्वेलर्समध्ये गेले आणि त्यांनी दुकान मालकाला, तुम्ही चोरीचे सोने विकत घेतले, त्यामुळे तुमची चौकशी करायची असल्याचे सांगत दुकानातील आतील बाजूस नेले. त्यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील 30 ते 35 तोळे सोने चोरून नेले. जाता जाता त्यांनी हवेत बंदुकीच्या 7 गोळ्या देखील झाडल्या.
दुकानातून बाहेर पडल्यानंतर आरोपी स्विफ्ट गाडीने साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.
हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1 हजार 12 कोरोना रुग्णांची भर; 24 जणांचा मृत्यू