पुणे - भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून नागरिकांना फसवणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पुण्याच्या किरकिटवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे.
तोतया लष्करी अधिकारी अटकेत या तोतयाकडून दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्याच्याकडे लष्कराचा पोषाख, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराचे चिन्ह असलेली टोपी असे साहित्य आढळून आले पोलिसांनी तेही जप्त केले आहे.
तोतया लष्करी अधिकारी अटकेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना किरकिटवाडी परिसरात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून एक व्यक्ती नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किरकिटवाडी परिसरात फिरणाऱ्या अंकित कुमार सिंह याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या तोतयासह तो सांगत असलेली त्याची पत्नी मीनाक्षी हिलाही चौकशासाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवेली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी या दोघांनाही हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.