पुणे - वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याबाबत राज्यातील वाहतुकदारांना खासगी फायनान्स कंपन्या आणि बँकांनी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली. खासगी फायनान्स कंपन्या आणि बँकांमार्फत होत असलेल्या मानसिक आणि आर्थिक त्रासाच्या निषेधार्थ पुणे शहरातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक आणि मनसे वाहतूक सेनेच्यावतीने आर.टी. ओ. कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. यावेळी ही मागणी करण्यात आली.
लॉकडाऊननंतर अनलॉकमध्येदेखील वाहने रस्त्यावर मोठ्याप्रमाणात सुरू झालेली नाहीत. यामध्ये स्कूल बस, खासगी बसेस यांचा समावेश आहे. राज्यात 28 लाख वाहनचालक आहेत. तर पुण्यात ट्रकची संख्या 38 हजारच्या आसपास आहे. याचा सर्वाधिक आर्थिक फटका हा खासगी बसचालकांना बसला आहे. त्यामुळे खासगी फायनान्स कंपन्या आणि बँकांनी 31 मार्च 2021 पर्यंत कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत द्यावी, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली.
हेही वाचा - चिखलीतील अधिकाऱ्याला मनसे जिल्हाध्यक्षांचा चोप, कामाचे पैसे मागितल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
अन्यथा...मनसे वाहतूक शाखेचा इशारा -
कोरोनाच्या काळापासून ते आतापर्यंत सरकारने वाहतूकदारांबरोबर योग्य भूमिका न घेतल्याने वाहतूकदारांसमोर आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज वाहतूकदारांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आज उद्योग धंदाच नसेल तर वाहतूकदार कर्ज फेडणार कसा? असा प्रश्न या वाहनचालकांसमोर निर्माण झाला आहे. मुंबईत मनसेकडून फायनान्स कंपन्यांना कायद्याच्या भाषेत समज दिल्यानंतर आज 90 टक्के कॉलिंग सेंटर आणि गाड्या उचलणे बंद झाले आहे. तशीच कायदेशीर समज पुण्यातील फायनान्स कंपन्यांना मनसेकडून देण्यात येणार आहे. तरीही मागणी मान्य केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी यावेळी दिला.