पुणे : मकर संक्राती सणानिमित्त कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उदघाटन समारंभ आज अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय सुनील डमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम.डी. कश्यप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कारागृह प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जाते : येरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारागृह आहे. या कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा झालेले कैदी शिक्षा भोगत असून शिक्षा कालावधीत कैद्यांना कारागृहात वेळ व्यतीत करायचा असतो. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून त्यांना विविध कलात्मक वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारागृहात सुतारकाम, शिवणकाम, बागकाम, बेकरी उत्पादने तसेच विविध वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी दिवाळी, राखी पौर्णिमा, नाताळ, गणेशोत्सव व मकरसंक्रांतीला कैद्यांनी घडविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदाच्या मकरसंक्रांतीला कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तू मांडण्यात आल्या आहे.
सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाचे आयोजन : कारागृहात विविध शासकीय कार्यालयांना लागणारी लोखंडी कपाटे, फर्निचर, गणवेश, सतरंजी, फाईल, बेडशीट, टाॅवेल आदी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंचा दर्जा चांगला असल्याने नागरिकांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या मकरसंक्रांतीला पहिल्यांदाच कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तू, साड्या अश्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विमानतळ रस्त्यावरील येरवडा कारागृहाच्या उद्योग विक्री केंद्रात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन व विक्री 26 जानेवारी पर्यंत उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह पेरवडा पुणे येथे सुरु राहणार आहे.
कारागृहात उत्पादित वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी : कैद्यांना कलागुण छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. कारागृहात उत्पादित वस्तूंना शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. टेबल, खूर्ची कपाटे, गणवेश, सतरंजी साठ्या फाईल्स इत्यादी परंतू बंदीजणांनी तयार केलेल्या नवनवीन कल्पक व दर्जेदार वस्तूंची शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. महाराष्ट्र कारागृह विभागा मार्फत विविध सणांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कारागृहात उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे आयोजित करण्यात येत असतात. कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक आहे तसेच कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले.