शिरुर (पुणे) - कोरोनाच्या या महासंकटकाळात लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे प्रत्येक जण घरात सुरक्षित बसला होता. मात्र, महावितरण नागरिकांना तीन महिन्यांचे एकत्रित वाढीव वीज बिल देऊन शिरुर तालुक्यातील नागरिकांना शॉक दिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
महावितरणचे अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन महावितरण कार्यालयात तोडफोड केली. तसेच वाढीव बिल आल्याने शिरुर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने नागरिक वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात जाऊन गर्दी करत आहेत. मात्र, याठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शिरुर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महावितरण कार्यालयात जाऊन मनसे स्टाइलने घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. तसेच पुढील काळात वीज लवकरात लवकर दुरुस्ती करुन वीज बील माफ करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरुपाची आंदोलन छेडण्याचा इशारा, असा इशारा मनसे कार्यकर्ता सुशांत कुटे यांनी दिला आहे.
हेही वाचा - नवी मुंबई मनपाच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन', मोबाइल डिस्पेन्सरी सेवेची सुरुवात
महावितरण कार्यालयाची तोडफोड करणे गुन्हा आहे. मात्र, सामान्य नागरिकांना महावितरणने लॉकडाऊन काळात भरमसाट वीज बिलाची आकारणी केली आहे. तसेच या वीज बिलाबाबत सरकारही चालढकल करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणार तरी कोण? असा संतप्त सवाल करत मनसे कार्यकर्त्यानी महावितरण कार्यालयाला लक्ष केले.