बारामती - पुणे जिल्ह्यात बिग बजेट असणारी एकमेव नगरपालिका म्हणून बारामती नगरपालिकेकडे पाहिले जाते. मात्र नगपालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळीचे बोनस मिळाले नाही. त्यामुळे बोनसच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी थेट पालिकेच्या मुख्य इमारतीवर चढून काळे झेंडे फडकावत आपला रोष व्यक्त केला.
बारामती नगरपालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे, मात्र पालिका कर्मचाऱ्यांना यंदा सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. मंगळवारपासून अनुदानाबाबतचा विषय चालू आहे. याबाबत पालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी कर्मचार्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून, जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नाही व पालिकेचा कोणताही पदाधिकारी तसेच नगरसेवक पालिकेच्या आंदोलनाकडे फिरकला नाही. परिणामी आज कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य इमारतीवर चढून आपला रोष व्यक्त केला.
बारामती नगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येते. मागील वर्षी 20 हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. मात्र यंदा हे अनुदान देण्यास पालिका टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी काम केले. त्यामुळे यंदा पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.