पुणे - एल्गार परिषद प्रकरणाचा तपास अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारीला एनआयएच्या न्यायालयात सादर करण्याचा आदेशही यावेळी न्यायालयाने दिला.
एल्गार परिषद तपास प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत, यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 29 जानेवारीला पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावर आज विशेष न्यायाधीश एस. आर नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य पोलीस सक्षम - अनिल परब
पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार उसळला होता. याच एल्गार परिषदेत माओवाद्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, राज्यात सत्तापालट होताच या गुन्ह्याचा पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावरच शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे.
हेही वाचा - '...म्हणून केंद्राने राज्य सरकारकडून कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास काढून घेतला'