पुणे- महावितरणमधील कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य न देता भरती केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन सरकार आणि वीज कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. कंत्राटी कामगारांनी शासनाविरोधात आणि संबंधित मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान कंत्राटी कामगारांनी भरती प्रक्रियेच्या फॉर्मची होळी करून जाहीर निषेध केला. महाराष्ट्रात 20 हजार कंत्राटी कामगार हे महावितरण, महापारेषण ,आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीत काम करतात. सध्या सुरू असलेली भरती प्रकिया रद्द करून आम्हाला सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी या कंत्राटी कामगारांची आहे.
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याऐवजी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आल्याने हे आंदोलन करण्यात आले, असे महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.