पुणे(पिंपरी-चिंचवड): आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून(गुरुवार) आठ दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. 9 जुलैपासून ते 16 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. मात्र, या लॉकडाऊनमधून आयटी कंपन्या, कामगार, बांधकाम साईट्स आणि अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
हिंजवडी, मारुंजी, मान, जांबे, नेरे या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रूग्ण आढळत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या परिसरात आठ दिवस कडकडीत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय स्थानिक सरपंच आरती वाघमारे आणि पूनम बुचडे यांनी घेतला आहे.
लॉकडाऊन दरम्यान पहाटे ६ ते ९ या वेळेत दूध पुरवठा करण्यास शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. हिंजवडीत कडकडीत लॉकडाऊन होणार असल्याने आयटी अभियंत्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, लॉकडाऊनमधून आयटी कंपन्यांना वगळण्यात आल्याचे मारुंजी गावच्या सरपंच पूनम बुचडे यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन दरम्यान हिंजवडी परिसरात विनामास्क फिरणाऱया नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.