पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोक्याच्या क्षणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाताळ ते ‘थर्टी फर्स्ट’च्या सुट्टीत चांगले उत्पन्न मिळवण्याचे नियोजन करणाऱ्या हॉटेलचालकांना याचा फटका बसला आहे.
संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांना ६० टक्क्यांपर्यंत बसणार फटका -
ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका क्षेत्रात कालपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. पुणे शहरातील हॉटेल व्यावसायिकांना काल (मंगळवारी) एका दिवसात ६० टक्क्यापर्यंत फटका बसला आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली हॉटेल व्यावसायिकांची साखळी अलीकडेच कार्यरत झाली. अजूनही त्यांची घडी पूर्णपणे बसलेली नाही. वर्षांअखेरच्या सुट्ट्यांच्या दिवशी चांगला व्यवसाय होईल, या हेतूने हॉटेलचालकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, निर्बंध लागू करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे, अशी माहिती अविष्कार हॉटेल्सचे मालक बाळासाहेब अमराळे यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडी महापालिकेतील १८ फुटीर काँग्रेस नगरसेवकांचा गट राष्ट्रवादीच्या गळाला?
संचारबंदीची वेळ ११च्या ऐवजी १२ करावी -
कोरोनामुळे झालेल्या नुकसानीतून अद्याप हॉटेल व्यावसायिक सावरलेले नाहीत. त्यातच संचारबंदीचा फटका बसणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चांगले उत्पन्न मिळते. मात्र, नियोजनावर पाणी फिरल्यासारखे आहे. शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नागरिक हॉटेल्समध्ये येत असतात. संचारबंदीची वेळ ११ केल्याने १० वाजता आम्हाला आवराआवर करावी लागेल. म्हणजे १० नंतर ग्राहकांना येता येणार नाही. यामुळे राज्य शासनाने आणि महापालिकेने संचारबंदीची वेळ ११ ऐवजी १२ वाजेपासून करावी, अशी मागणीही अमराळे यांनी केली आहे.
आधीच खूप फटका बसलाय त्यात आत्ता संचारबंदी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल्स व्यवसाय सात महिने बंदच होत्या. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेत कोरोना नियमावली तयार करत हॉटेल्सना परवानगी देण्यात आली होती. ५० टक्के ग्राहकांना परवानगी असली, तरी प्रत्यक्षात आम्ही कमी कामगार घेऊन ३५ टक्के ग्राहकांनाच सेवा देऊ शकत आहोत. व्यवसाय सुरळीत होत असताना आता परत संचारबंदी लागू केल्याने अजून मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.