पुणे - भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. कारण या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जागरुकता राखण्याचा प्रयत्न सर्व नागरिक करत आहेत. तशीच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीत दाखविली आहे.
आज बारामतीत झालेल्या विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले. तसेच जोपर्यंत कोरोना संपूर्णपणे जात नाही, तोपर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासा पवार यांनी केला. तसेच नागरिकांना तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा, घरी हातात हात दिला तरी चालेल, पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
त्याबरोबरच उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे, असे काहींना वाटेल. पण, डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करत असल्याचे पवार यांनी सांगितले. तर डॉक्टर तुम्हीच सांगता हस्तांदोलन करु नका आणि तुम्हीच हस्तांदोलन करता, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांनाही हळूच चिमटा काढला.