पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता २४ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यानंतर आणखी १४ मार्चपासून हा लॉकडाऊन पुन्हा वाढवून ३ मेपर्यंत कायम ठेवण्यात आला. या कालावधीत पुण्यात पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली. या कालावधीत अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त नागरिकांना आणि वाहतुकीला मनाई करण्यात आली. तर या काळात अनेक विदेशी नागरिकही पुण्यात अडकून पडले होते. पुणे पोलिसांचे एक पथक नागरिकांच्या अडचणीचे गांभीर्य पाहून त्यांना सवलत देण्याचे काम करीत आहेत.
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक देशांच्या दूतावासांनी भारतात आलेल्या त्यांच्या नागरिकांना स्वतःच्या देशात जाण्यासाठी खास विमानांची सोय केली आहे. त्यानुसार पुण्यातून आतापर्यंत ४५५ नागरिकांना पुणे ते मुंबई असा प्रवास करण्यास सवलत दिली. त्यानंतर मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे नागरिक आपापल्या देशाकडे रवाना झाले. यामध्ये जर्मनी १५०, यूएसए १३१, बेहरिन १२५, फ्रांस १६, ब्रिटिश ७, स्वीडन ७, जपान ६, कॅनडा ४, आयरिष ४, ब्राझील ३, रोमानिया १, आस्ट्रेलिया १ या देशातील नागरिकांचा समावेश आहे. अजूनही काही विदेशी नागरिक पुण्यात अडकून पडले आहेत. तर त्यांनाही त्यांच्या मायदेशी जाण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - ग्रीन झोन गडचिरोली : जिल्हा 'असा' राहिला कोरोनामुक्त, गडचिरोली प्रशासनाचे यश