पुणे - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडले असून सर्वसामान्यांच्या खिशाला याची झळ बसत आहे. हे पाहता सध्या अनेक वाहनचालक सीएनजी वाहनांकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीएनजी 55 रुपये किलो असून पेट्रोल 97, तर डिझेल 87 प्रति लिटर आहे. त्यामुळे सीएनजीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
केंद्र सरकार आणि राज्यसरकार मागे हटण्यास तयार नाही -
केंद्र आणि राज्यसरकार यांच्याकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणार कर आणि व्हॅट पाहता पेट्रोल आणि डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांचे महागाईने कंबरडे मोडले आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एकीकडे दररोज ची गरज म्हणून पेट्रोल, डिझेलकडे पाहिलं जातं. त्यामुळेच सर्वसामान्य जनता केंद्र आणि राज्यशासनाचा तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करताना दिसत आहे.
शहरात वाहनधारकांचा सीएनजीकडे कल -
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजी गाडी वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सीएनजी गाडी परवडत असल्याचे वाहनधारक सांगतात. सीएनजी 55 रुपये किलो असून वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या चांगल्या मायलेज देतात. तसेच, भाडेतत्त्वावर मोटारी चालवणारे वाहनधारकांचा कलदेखील सीएनजीकडे आहे.
शहराबरोबर ग्रामीण भागात सीएनजी पंप उभारण्याची गरज -
केंद्र आणि राज्यसरकारने वेळीच पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आणले नाहीत, तर सीएनजी हे सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरेल. तसे नियोजन राज्यसरकारला करणे भाग पडेल आणि शहराबरोबरच ग्रामीण भागात सीएनजी पंप उभारावे लागतील, हे तितकेच खरे आहे.