पुणे - दौंड विधानसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दौंड तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यात प्रमुख लढत निवडणूक प्रक्रियेत पाहायला मिळत आहे.
दौंड विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खुटबाव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी रमेश थोरात हे सहकुटुंब मतदानाला उपस्थित होते. यावेळी रमेश थोरात यांच्या पत्नी, मंगल थोरात, मुलगा गणेश थोरात, मुली स्नेहा आणि अर्चना उपस्थित होत्या.
हेही वाचा -बारामतीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
रमेश थोरात यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. 'या निवडणुकीत तगडे आव्हान समोर आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी राहू येथील कैलास विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. त्यांच्यासोबत पत्नी कांचन कुल आणि आई रंजना कुल यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा -बारामतीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
'महायुती ने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः येथे सभा घेतली. आम्ही व्यवस्थित रीतीने मतदान यंत्रणा राबविली आहे. यामुळे आम्ही आशावादी आहोत. मतदार आम्हाला बहुमताने मतदान करतील. तसेच पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी देतील', असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'