बारामती - कुत्र्यासारखा इमानदार कोणताही पाळीव प्राणी नाही. कुत्र्यासारखा निष्ठावान प्राणी शोधून सापडणार नाही. कुत्र्यांच्या कौटुंबिक प्रेमाच्या अनेक कहाण्या आपल्याकडे प्रचलित आहेत. याची प्रचिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील एका कुटुंबाला आली. डॉलर नावाच्या लॅब्रेडॉर जातीच्या या श्वानाने सर्पमित्र येईपर्यंत तब्बल अर्धा तास विषारी नागाचा रस्ता रोखला. नागाला त्याने टीचभर हलूही दिले नाही.
सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील धुमाळ कुटुंबीय नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते. संध्याकाळच्या ७ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांनी पाळीव श्वान डॉलरला मोकळ सोडलं. त्यानंतर डॉलर जोर-जोरात भुंकू लागला. नेहमीपेक्षा तो अधिक तीव्र भुंकत होता. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने पाहिले असता घराच्या पाठीमागे एक विषारी नाग होता. त्या नागाला डॉलर घरात जाण्यापासून रोखत होता.
सर्पमित्र येईपर्यंत तब्बल अर्धा तास नागाला रोखले-
कुटुंबातील व्यक्तींना तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सर्प मित्रांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. आठ फाटा येथील सर्पमित्र मिलिंद कांबळे येईपर्यंत तब्बल अर्धा तास डॉलर या श्वानाने विषारी नागाचा रस्ता अडवला होता. सर्पमित्र येताच त्यांना मोठ्या शिताफीने या विषारी नागाला पकडले व सुरक्षितरित्या वनविभागात सोडून दिला.
श्वानाचे कौतुक-
श्वानाने आज स्वताची पर्वा न करता कुटुंबाचे प्राण वाचवले, अशी भावना धुमाळ कुटुंबाने व्यक्त केली आहे. तसेच या धाडसी श्वानाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा- तांत्रिक बिघाड... इथोपियन कार्गो विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग